Sunday, May 8, 2011

जीवनात संस्काराचे महत्त्व

जीवनात संस्काराचे महत्त्व
प्रत्येक मनुष्य हा स्वत:च्या निराळ्या पद्धतीने जीवन जगत असतो.जीवन जगतांना सुखांचा वर्षाव होतो,दु:खांचा डोंगर कोसळतो,दु:खरूपी सागरातून तरून जाण्यासाठी लहानपणीची "संस्कारनौका" मग साहाय्य करते.भारतीय संस्कृतीत संस्काराला फार महत्त्वआहे.मनुष्य जन्माला आल्यापासून मरणापर्यंत त्यावर विविध सोळा संस्कार करावे लागतात.ते खालीलप्रमाणे:-
१)गर्भाधान
२)पुंसवन
३)सीमंतोन्नयन
४)जातकर्म
५)नामकरण
६)निष्क्रमण
७)अन्नप्राशन
८)चौल(चूडाकर्म)
९)उपनयन
१०)मेधजनन
११)महामाम्नीव्रत
१२)महाव्रत
१३)समावर्तन
१४)उपनिषदव्रत
१५)विवाह
१६)अंतेष्टी
या सोळा संस्कारांपैकी सर्वात महत्त्वाचे संस्कार म्हणजे गर्भाधान व अंतेष्टी संस्कार .गर्भाधान संस्कार जन्मापूर्वी केला जातो.होणार्या बालकाची माता कशी राहते,काय खाते,कसे वर्तन करते या बाबींवर येणार्या बालकाचा स्वभाव अवलंबून असतो.त्यामुळे लहानपणीच्या संस्कारांना महत्त्व आहे.ज्याप्रमाणे असतील संस्कार-त्याप्रमाणे मनुष्य जगणार.
दु:खातही हिंमत न हरता,जिद्दीने पुढे जाणारी आई असेल तर मुलगासुध्दा दु:खात हरत नाही व हिंमतीने त्याचा सामना करतो.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ मातेनी शिवाजी महाराजांवर अन्यायाच्या विरोधात लढण्याचे,न्यायपूर्ण जीवन जगण्याचे संस्कार केले व स्वराज्य स्वप्न साकार झाले.
निर्धार जिजाईने केला
पढविला बाळ शिवबाला
पुराणाचा देऊनी दाखला
छत्रियांचा बाणा शिकवीला
वरील काव्यामधून असेच लक्षात येते की,लहानपणी आई-वडिल व गुरुजनांकडून जे संस्कार होतात त्याप्रमाणे आपले पुढचे आयुष्य घडते.भारताची वैज्ञानिक प्रगती करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन असणारा व अंधश्रद्धा न मानणारा समाज घडवणे आवश्यक आहे व त्यासाठी संस्कार आवश्यक आहेत.लहानपंणी नीटनेटकेपणा,संवेदनशीलता,स्त्री-पुरुष समानता,स्वच्छता अशा लहान-लहान गोष्टींचे मुलांवर संस्कार केल्यास मुले जीवनात यशस्वी होतात.म्हणुनच सद्गुण-संपन्न होण्यासाठी,व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी,भ्रष्टाचार बंद करण्यासाठी,निरक्षरता संपवण्यासाठी,दु:खातून बाहेर पडून सुखरूप होण्यासाठी संस्कार जीवनात अतिशय आवश्यक व महत्त्वाचे आहेत.आजच्या या विज्ञानयुगात अश्लिलता व पाश्चिमात्य देशांचे वाईट गोष्टींचे अंधानुकरण वाढत आहे अशा या बदलत्या काळात प्रसारमाध्यमांच्या बदलत्या रूपामुळे संस्कार व संस्कृतीचे रक्षण करणे आवश्यक आहे.