Monday, May 9, 2011

संत तुकाराम महाराज

महाराष्ट्र हा देश संतांची भूमी म्हणून ओळखला जातो.संत ज्ञानेश्वरांपासून सुरु झालेली परंपरा संत कविश्वर महाराज,गाडगे महाराज,तुकडोजी महाराजांपर्यंत अजूनही सुरूच आहे व भारतात दिवसेंदिवस संत व साधु-सज्जनांची भर पडत आहे परंतू या सर्व संतांमधील वारकरी संप्रदायाचा कळस समजले जाणारे,जगद्गुरु माऊली संत तुकाराम महाराज हे अनेक लोकांचे अतिशय आवडते संत आहेत.तुकोबारायांनी जो भक्तिमार्ग समाजाला  दिला व तळागाळातील लोकांना वेदांताचा अर्थ समजावून सांगीतला त्यामुळे त्यांचे कार्य वारकरी संप्रदायात फार मोठे समजले जाते.अशा या महान संतपुरुषाचे संक्षिप्त चरित्र सर्वांना समजावे म्हणून येथे देत आहे.


संत तुकाराम


संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव होते तुकाराम वोल्होबा मोरे.शके १५३० मध्ये श्री क्षेत्र देहू(पुणे जिल्हा) येथे तुकोबारायांचा जन्म झाला.लहानपणापासून भक्तिमार्गाकडे त्यांचा ओढा होता.वयाच्या १३व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या गळ्यात संसार बांधला.१५४४-१५४६च्या दरम्यान त्यांचे पहिले व दुसरे लग्न झाले.सतराव्या वर्षी तुकोबारायांचे आई-वडिल व भाऊजय वारली त्यानंतर काही काळाने त्यांचा वडिल भाऊ घरातून निघून गेला.परंतू सन १५५१-५२च्या दरम्यान फार मोठा दुष्काळ पडला,ते भयंकर रूप पाहून तुकाराम महाराजांमधील संत प्रवृत्ती जागी झाली.दुष्काळा दरम्यान त्यांच्या पहिल्या बायकोचे व मुलाचे निधन झाले म्हणून संसारात सुख नाही ,व मी जर संसारात अडकलो तर मग भगवंतापर्यंत मला पोहोचता येणार नाही असा विचार करून महाराजांच्या परमार्थाला सुरूवात झाली त्यानंतर ते संसारापासून हळूहळू विरक्त होऊन एकटेच भंडारा पर्वतावर भजन-किर्तन करित बसत असत.हळूहळू त्यांना ईश्वराचा ध्यास लागला,व सर्वत्र विठठलाचा साक्षात्कार होऊ लागला.त्यांच्या मुखातून आपोआप अभंग-रचना बाहेर पडत असत.
"जोडोनिया धन उत्तम वेव्हारे 
उदास विचारे वेच करी"
अशा प्रकारच्या अभंगांमधून त्यांनी समाजाला उपदेश केला.संसारी माणसाला परमार्थाची शिकवण दिली.
"मस्तकी पडोत दु:खाचे डोंगर।सुखाचे माहेर सोडू नये॥
तुका म्हणे आता सांगु तुला किती।जिण्याची फजिती करू नये॥"
अशा अभंगांमधून त्यांनी सामान्य माणसाला व समाजाला उपदेश केला.
"असाध्य ते साध्य करिता सायास।कारण अभ्यास तुका म्हणे।"
असे सांगून त्यांनी प्रयत्नांचे व अभ्यासाचे महत्त्व विशद केले.
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे।पक्षीही सुस्वरे आळविती।"
तुकोबांच्या अभंगाचे कौतुक जितके करावे तितके कमी.संपूर्ण वेदांचा सार जणू त्यांच्या वाणीतून ज्ञानरूपाने अमृतासारख्या गोड शब्दात बाहेर पडत होता.त्यांनी ४०००पेक्षा जास्त अभंग रचले.त्यांच्या अभंगांची गाथा प्रत्येकाने जरूर वाचावी व देहूला जावे.आपल्या जीवनकार्यात महाराजांनी अनेक चमत्कार केले परंतू त्यामधूनही समाजाला अंधश्रधदेपासून दूर राहण्याची शिकवण दिली.म्हणूनच असे म्हणतात की तुकारामांनी सदाचार,सद्गुण,सत्य,संयम,प्रसन्नता,देशभक्ती,देवभक्ती समाजाल पोहोचवली.असा हा समाज मार्गदर्शक संत व सर्वगुण संपन्न महात्मा वैकुंठात विलीन झाला व पांडूरंगाच्या चरणी एकरूप झाला.
तुकाराम महाराज की जय!!!